नागपूर: देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना लोकप्रतिनिधी मात्र संसदेत आपले वेतन वाढविण्याची वारंवार मागणी करतात ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असून मी माझ्या ९ वर्षांच्या कार्यकाळात एका ही महिन्याचे मानधन स्वीकारले नसल्याचा खुलासा खा. वरुण गांधी यांनी केला. ते म्हणाले की, मी प्रत्येक महिन्याला लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहितो की, माझे मानधन एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा स्वयंसेवी संस्थेला द्या. मी हे सर्व दानधर्म किंवा कृतज्ञतेपोटी करीत नाही. तर हा आम्हा लोकप्रतिनिधींचा धर्मच आहे. मध्यंतरी मी लोकसभा अध्यक्षांना अशी विनंती देखील केली होती की, सर्व खासदारांनी आपापल्या मानधनाचा त्याग करावा. कारण त्यांच्याकडे गरजेपेक्षा कितीतरी अधिक आहे. ते युवा सन्मान संवाद परिषदेचे उदघाटक व प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
युवा मुक्ती अभियान विदर्भ यांच्याद्वारे ही युवा परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दारूबंदी कार्यकर्ते महेश पवार (यवतमाळ), आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांच्या पुनर्वसनासाठी काम करणारे मारोती चवरे (वर्धा), शाळाबाह्य मुलांचा प्रश्न अभ्यासणाऱ्या व त्यासाठी ठोस उपाययोजना सुचवणाऱ्या संजीवनी ठाकरे पवार (अमरावती), प्रशांत डेकाटे (नागपूर), श्रीकांत भोवते (गोंदिया), गौरव टावरी (नागपूर) यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित युवकांशी संवाद साधताना खासदार वरुण गांधी यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले की, सामाजिक न्याय मिळाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. बदलत्या सामाजिक संरचनेत युवकांची भूमिका मोलाची आहे. त्यांना मिळणारे शिक्षण हे रोजगार मिळवण्यासाठी उपयुक्त ठरत नाही. युवकांना शास्वत शिक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका वरुण यांनी घेतली.
समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या तरुणांचा वरुण यांनी उल्लेख केला. रवी तेजा(हैदराबाद), अफरोज शाह (मुंबई), बाबर अली (पश्चिम बंगाल) यांनी आपल्या भागात केलेल्या विधायक कामांचा दाखले त्यांनी दिले. गरिबी, भुकमरी आणि पाण्याचा प्रश्न ही आपल्या देशातील मोठी समस्या असल्याचे ते म्हणाले. यासाठी सुलतानपूर येथे कम्युनिटी फ्रिज आणि लखीमपूर खिरी येथे रोटीबँक सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मी एक पुस्तक लिहीत असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र्राला मिळणारे ५५% पाणी मुंबई, पुणे आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्येच वापरले जात असल्याचे वरुण यांनी सांगितले. भ्रष्टाचार संपण्यासाठी संपूर्ण माहिती आणि खर्च हा जनतेसमोर सादर व्हायला हवा. तसेच यात संपूर्ण पारदर्शिता असली पाहिजे असे ते म्हणाले. सध्याचा माहिती अधिकार कायदा चांगला आहे परंतु त्याद्वारे माहिती मिळायला सहा महिन्यांचा कालावधी लागतो. तसेच अनेक पळवाटा असल्याने हवी ती माहिती बहुतेक वेळा मिळत नाही.
कठुआ, उन्नाव येथील गॅंगरेपच्या घटनांबद्दल खंत व्यक्त करताना वरुण म्हणाले की, हे सगळे ऐकून आणि पाहून प्रश्न पडतो की आपण नेमके कोणत्या देशात राहतो. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी पक्षभेद विसरून एकजुटीने काम केले पाहिजे. मी निवडणूक जिंकलो तेव्हा प्रतिस्पर्ध्यांना भेटून त्यांचीही मते जाणून घेतली. विकासाच्या प्रक्रियेत त्यांनाही थोडा हिस्सा देऊ केला. असे सगळीकडे घडले तर कुण्या पक्षाचा नाही पण देशाचा विकास मात्र नक्की होईल यात शंका नाही, असा आशावाद वरुण गांधींनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युगांतर संस्थेचे राजकुमार तिरपुडे होते. तर जेष्ठ आंबेडकरी विचारक डॉ. अशोककुमार भारती, प्रा. डॉ. केशव वाळके आणि आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते नितीन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. भूपेश पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन नितीन चौधरी यांनी केले. वरुण गांधी तब्बल २ तास उशिरा कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात श्रोत्यांची भुक व कंटाळ्याने पुरेवाट झाली होती. दरम्यान वरुण गांधी कार्यक्रमात पोहोचेपर्यंत युवा कार्यकर्ते आणि इतरांनी मंचावरून आपले विचार व्यक्त केले.
—Swapnil Bhogekar