नागपूर : एकीकडे ‘इंडिया’ आघाडीचे प्रमुख नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाचे धनाढ्य उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात आवाज उठवला आहे. तर दुसरीकडे ‘इंडिया’ आघाडीतले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अहमदाबादेत जाऊन अदानी यांची भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार यांनी दुसऱ्यांदा अदानी यांची भेट घेतली आहे. यावर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकार परिषदेतदरम्यान भाष्य केले.
कोण कोणाला भेटतो याच्याशी काँग्रेस पक्षाचे काही देणेघेणे नाही. शरद पवार कोणाला भेटतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न नाही.काँग्रेस या भेटीमुळे नाराज नाही, असे पटोले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या आधार देशाला उभं करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसने जे काही कमावून ठेवले ते विकण्याचे काम आता भाजप करत असल्याचा घणाघात पटोले यांनी केला. या पत्रकार परिषदेला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार यांनी दुसऱ्यांदा अदानी यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी ‘एनडीए’ला पाठिंबा द्यावा, असा मेसेज सत्ताधारी पक्षाचे शीर्षस्थ नेते देशातल्या मोठ्या उद्योगपतीच्याद्वारे देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. किंबहुना तशी शक्यता काँग्रेस नेत्यांनीही बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर पवार आणि अदानी यांच्या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झाले होते.