मुंबई: पुण्यात जीबीएस’ अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे अनेक रुग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत पुणे महापालिका व राज्य सरकारला संभाव्य संकटाबाबत सतर्क केले आहे. पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
‘जीबीएस’ अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर आणि शहरालगत काही भाग विशेषतः सिंहगड रस्त्यावरील पुणे मनपामधील नवी समाविष्ट गावांमध्ये नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनात आले आहे. या दुर्मीळ आजाराची दाहकता लक्षात घेता आणि नागरीकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची आणि गंभीर बाब म्हणावी लागेल.
दूषित पाण्यातून या आजाराचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी. संभाव्य संकटाचे अतिदक्षतापू्र्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.