पुणे: ‘शरद पवार हे शेतकऱ्यांचे नव्हे, तर शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समुहाचे नेते आहेत, अशा शब्दात भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
सध्या राज्यभरात विविध मागण्यांसाठी शेतकरी संप सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य्क्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना भडकवणारे वक्तव्य केले. “सामान्य माणसाला त्रास होईल, लोकांवर आघात होईल असं काही करु नये. पण हा संघर्ष प्रश्न सुटल्याशिवाय थांबणार नाही, हा निकाल घ्यावा लागेल सरकारने दिलेली आश्वासनं पाळण्याची त्यांची नियत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
शरद पवारांच्या या वक्तव्याचा प्रकाश आंबेडकरांनी समाचार घेतला. ”जो पर्यंत देशातला शेतकरी जातीवर मतदान करत राहील, तोपर्यंत आत्महत्या करणे थांबणार नाहीत. त्याला अन्नधान्य, शेतमाल फेकण्याशिवाय पर्याय नाही. जातीसाठी स्वतःचा किती नुकसान कार्याचा आता हे शेतकऱ्यांनी ठरवले पाहिजे,” असं आंबेडकर म्हणाले.
याप्रकरणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं. ”पवार इतके वर्षे सत्तेत असताना जनतेची कामं करता आले नाही. शेतकऱ्यांना भडकवण्यामागे पुन्हा सत्तेत जाण्याची घाई आहे असं दिसतं,” असं म्हणत मुनगंटीवारांनी पवारांना उत्तर दिलं. ”शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा त्यांना आत्महत्या थांबवता आल्या नाही. आमचं सरकार योग्य मार्गाने निघालं आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे, तेव्हा आपल्याला स्वत:च्या शेतावर जावं लागेल याची भीती पवारांना वाटत असावी,” असा टोलाही मुनगंटीवारांनी लगावला.