नागपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. तर शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाला तीन नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता.
निवडणूक आयोगाच्या या आदेशानुसार शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात तीन नावांचा प्रस्ताव पाठवला होता. याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
या नावाने ओळखला जाणार शरद पवार गट-
शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार आणि नॅशॅलिस्ट काँग्रेस पार्टी–एस, असे तीन पर्याय आयोगाला सुचवण्यात आले होते. या तीन पर्यायांपैकी दुसरा पर्याय आयोगाने मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक पार पडेपर्यंत शरद पवार गट ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार’ म्हणजे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ या नावाने ओळखला जाणार आहे.