नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांची संघर्ष यात्रा १२ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर धडकणार आहे. या यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांची २४ ऑक्टोंबर २०२३ पासून संघर्ष यात्रा सुरू आहे. जवळपास ८०० किलोमीटरची ही पदयात्रा आहे. विविध मागण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. राज्यातील कंत्राटी नोकरभरती रद्द करा , बेरोजगारी कमी करा, जातनिहाय जनगणना करा, शाळा दत्तक योजना रद्द करावी, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायद लागू करावा, अंमलीपदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या युवकांना वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना करा,या मागण्यांकडे या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात येत आहे.
१२ डिसेंबरला ही यात्रा नागपूर येथे पोहोचणार असून याचे रुपांतर मोर्चात होवून हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. त्यानंतर झिरोमाईल येथे राष्ट्रवादीची सभा होणार आहे. यादरम्यान सभेला संबोधित करण्यासाठी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहतील, अशी माहिती देशमुख यांनी दिली.