नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित केले. राज्यात मराठा आरक्षणावरून मोठा वाद पेटला आहे. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा राहिलेला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सध्या राज्यात मराठा आरक्षणाची मोठमोठी आंदोलने सुरू आहेत. मात्र आपण मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास काढून पाहिला तर लक्षात येतं की, मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाही त्यांनी आरक्षणसंदर्भात कोणतीच मोठी पाऊले उचालली नाही. शरद पवारांच्या मनात असते तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाही मराठा आरक्षण देता आले असते, मात्र त्यांनी कधीच तसे केले नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात आरक्षण प्रश्नावरून टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आपले सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिले . ते आरक्षण आपण हायकोर्टात टिकवले, सुप्रीम कोर्टातही आपले सरकार असेपर्यंत हे आरक्षण टिकले होते . उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तर मंडल आयोगालाही विरोध केला होता. तुम्ही मंडल आयोगाला विरोध केल्यामुळेच छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले होते आणि आता तुम्ही तोंड वर करून बोलता, असा घणाघात फडणवीस यांनी केला.
मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस म्हणाले. मात्र हे आरक्षण देताना आपण ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.