मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. पवारांच्या या निर्णयानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाचा विरोध केला. मात्र पवार आपल्या भूमिकेशी ठाम आहेत.
शरद पवारांनी पुढील अध्यक्ष निवडण्यासाठी समितीची नेमणूक केली होती. त्यानंतर आज पवारांनी निवडलेल्या समितीची बैठक झाली. या समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नेत्यांनी एकमताने फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांनीच अध्यक्ष राहावे असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर समिती आता त्यांचा निर्णय शरद पवारांपर्यंत पोहोचविणार असल्याची माहिती आहे. शरद पवारांनी अध्यक्षपदी कायम राहावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. मागील तीन दिवसांपासून कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पुकारले आहे.
शरद पवारांच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज सकाळी राष्ट्रवादी कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी भिवंडी येथील राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षाने अंगावर पेट्रॉल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि इतर कार्यकर्त्यांमुळे मोठा अनर्थ टाळला.