परभणी : शहीद जवान शुभम सुर्यकांत मुस्तापुरे यांच्यावर आज सकाळी 10 वाजता परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडी ता.पालम येथे विराट जनसमुदायांच्या साक्षीने ‘अमर रहे अमर रहे शहीद शुभम अमर रहे’ च्या जयघोषात साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शासकीय इतमामात झालेल्या या अंत्यसंस्कार प्रसंगी प्रारंभी शासनाच्यावतीने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी शहीद शुभम यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. या शिवाय आमदार राहुल पाटील, मधुसूदन केंद्रे, मोहन फड तसेच अपर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे तसेच विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी शोकाकूल वातावरणात पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
शहीद जवान शुभम यांचे वडिल सुर्यकांत मुस्तापुरे यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी धार्मिक रितीनुसार दफणविधी पूर्ण केला. तत्पुर्वी पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. तसेच सैन्य दलाच्या औरंगाबाद स्टेशन हेडक्वार्टरच्या 9 सैनिकांच्या तुकडीनेही रितसर बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. यावेळी दोन्ही तुकडीच्या बँड पथकांनी शोकधून वाजवली. तिरंग्यामधील शहीद शुभमचे पार्थिक दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
जम्मु काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात 3 एप्रिल रोजी भारतीय जवान शुभम मुस्तापुरे शहीद झाले. त्यांचे पार्थिव काल संध्याकाळी विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात आले. काही काळ छावणी परिसरात सैन्य दलाच्या वतीने अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. 5 एप्रिल रोजी पहाटे पार्थिव चाटोरी या गावी आणण्यात आले. तेथून कोनेरवाडी येथे आणले त्यानंतर गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंतिम दर्शन घेतले.