मुंबई : अकोल्यात कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारीवरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. याच प्रकरणावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समाचार घेतला. या घटनेमुळे राज्य सरकारची प्रतिमा मालिन होत असून यापुढे अशा घटना होऊ नयेत, असे सत्तार यांना ठणकावून सांगण्यात आले.
छापेमारीत अब्दुल सत्तार यांच्या पीएचा सहभाग असल्याची माहिती समोर आली, यासंदर्भात शिंदे यांनी कृषिमंत्र्यांनी जाब विचारला. सत्तार यांचे पीए दीपक गवळी हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बियाणे गोदामांवर अनधिकृतपणे छापे टाकून पैशांची मागणी करणाऱ्या पथकाचा एक भाग म्हणून सापडल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. सत्तार यांनी १० जून रोजी गवळी हे आपले पीए नसून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा दावा केला होता.योगायोगाने, सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्याची कागदपत्रे समोर आली असून त्यात गवळी हे सत्तार यांचे पीए म्हणून दाखविण्यात आले आहेत.
सत्तार यांच्या स्पष्टीकरणाला मंत्रिमंडळाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी खरीप हंगामापूर्वी बाजारात बोगस बियाणे विकल्या जाण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली, असे सूत्रांनी सांगितले. कृषी, महसूल आणि गृह विभाग एकत्रितपणे छापे टाकतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.ही जिल्हास्तरीय समस्या आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा अधिकार आहे, असेही सूत्राने सांगितले.महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनोज सौनिक येत्या आठवडाभरात सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या विषयावर चर्चा करणार आहेत, ताशीव माहितीही समोर येत आहे.
दरम्यान अकोल्यातील प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर मोठ्याप्रमाणावर टीका होत आहे. सोबतच कारवाई साठी आलेल्या पथकाने पाच लाखांची खंडणी मागितली असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत सत्तार यांना खडेबोल सुनावले.