नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या ७ डिसेंबरपासून म्हणजेच उद्या नागपुरात होणार आहे. यापार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.
कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत बंडखोरी झल्यानंतर सत्तासंघर्ष सुरु आहे. यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या आमदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मूळ बोधचिन्ह बहाल केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल चिन्ह देण्यात आले. पण, नागपुरातील विधानभवन परिसरात देण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाच्या फलकावरून मशाल चिन्ह गायब करण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट तसेच ठाकरे गट आणि शिंदे गटात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान विधान भवन परिसरात विविध राजकीय पक्षांचे विधिमंडळ पक्ष कार्यालय आहेत. त्या कार्यालयाच्या फलकावर पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या पक्षाची चिन्हे आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यालयाच्या फलकावर मशाल चिन्ह नाही. त्या फलकावर केवळ शिवसेना पक्ष कार्यालय असे नाव आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाचे नेते आणि मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे.