पुणे – दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरी केली जाते. यापार्श्वभूमीवर पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी आपल्या भाषणादरम्यान मोठी घोषणा केली.
शिवाजी महाराज उत्तम योद्धेच नव्हते तर उत्तम प्रशासकही होते. शिवाजी महाराजांचे गड, किल्ले आमच्यासाठी कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यावरील अतिक्रमणं काढण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तसेच फडणवीस यांनी शिवरायांचे विचार आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली आणि शिवरायांचा गौरव केला.
आमच्यासाठी मंदिरापेक्षा गड किल्ले मोठे अन् महत्वाचे-
देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्यापेक्षा कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. या किल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी आपण काम करत आहोत. गड किल्ल्यांची निगा राखावी ते अबाधित राहावे यासाठी सातत्याने काम करत आहोत. अनेक कामे आपण सुरु केले आहे. शिवनेरीचे रुप आपण पाहत आहोत. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणं काढण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवनेरी परिसराचा विकास करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. अजित पवार, एकनाथ शिंदेंसह मी येथे आहे आम्ही तिघे येथे शासक नाही तर शिवरायांचे मावळे म्हणून आहोत. आम्ही तिघे मिळून शिवरायांच्या किल्ल्यांचे आणि गडाचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे फडणवीस म्हणाले.