पालघर: पालघरमधील सातपाटी येथील बंदरात मासेमारीसाठी नेलेल्या ‘शिवनेरी’ बोटीला अपघात झाला आहे. या अपघातामुळे 12 खलाशी समुद्रात अडकले आहेत. सातपाटी बंदरातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेली “शिवनेरी नौका” जोरदार लाटेच्या तडाख्याने उलटली. या नौकेतील 12 खलाशी कामगार समुद्रात फेकले गेल्याची माहिती समोर आली आहे. अपघात होऊन 5 तासांचा अवधी लोटूनही अपघातग्रस्तांना कोस्टगार्डची मदत मिळू शकलेली नव्हती.
सातपाटी येथील मच्छिमार विनोद पाटील यांनी आपली शिवनेरी ही मच्छिमारी नौका बंटी धनू यांना भाडेतत्त्वावर दिली होती. मासेमारी बंदीचा कालावधी जवळ आल्याने शेवटची फेरी(ट्रिप) मारण्यासाठी मागील 8 दिवसांपासून ही नौका समुद्रात होती. 70 नॉटिकल समुद्री क्षेत्रात मासे कमी मिळत असल्याने ही नौका मंगळवारी (8 मे) 28 नॉटिकल क्षेत्रात मासेमारीसाठी आली. यावेळी नौकेच्या आतील डेकमध्ये ठेवण्यात आलेली दुसरी जाळीबाहेर एका बाजूला ठेवलेली होती. नेमके याच वेळी आलेल्या जोरदार लाटेने शिवनेरी उलटली आणि सर्व 12 खलाशी कामगार समुद्रात फेकले गेले.
यावेळी हाताला मिळेल त्या वस्तूंचा आसरा घेत हे सर्व समुद्रात मदतीसाठी धावा घेत होते. कोस्ट गार्डला संपर्क साधून ही अपघातग्रस्त ठिकाणचे लोकेशन आणि नॉटिकल मैलची माहिती विचारण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडून काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे या नौकेचे मालक विनोद पाटील यांनी सहकारी संस्थेचे चेअरमन रवींद्र म्हात्रे यांची नौका आणि स्थानिकांना सोबत घेत सरळ समुद्राच्या दिशेने प्रयाण केले. सदर अपघातग्रस्त नौकेशी सध्या संपर्क तुटला असल्याने पुढील माहिती काळू शकलेली नाही.