मुंबई : दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करत, एसटी महामंडळातील शिवशाहीच्या खासगी चालकांनी बुधवार, १३ जूनपासून दुपारी १२ वाजल्यानंतर संप पुकारला, यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या शिवशाहीच्या अनेक फे-या रद्द करण्यात आल्या. या संपामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाडेतत्त्वावर १ हजार ५०० शिवशाही एसटी ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला. जून २०१८पर्यंत सात खासगी कंपनीच्या ३७५ शिवशाही राज्याच्या मार्गात धावत आहेत. यात ५० शिवशाहींचाही समावेश आहे. श्री कृपा कंपनीचे चालक गेल्या दोन महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. कंपनीकडून वेतनाच्या मुद्द्यावर चालढकल करण्यात येत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
श्री कृपा कंपनीच्या महामंडळात एकूण ३६ शिवशाही धावत आहेत. यात मुंबई-६, रत्नागिरी-१४, ठाणे-६, सातारा-२ , लातूर आणि बीड प्रत्येकी ४ अशा शिवशाहींचा समावेश आहे. यापैकी रत्नागिरी विभागातील चालकांनी बुधवार, १३ जूनपासून दुपारी १२ वाजल्यापासून संप पुकारला. परिणामी, रत्नागिरी विभागातून मुंबईकडे येणाºया सुमारे १०-१२ शिवशाहींच्या फेºया रद्द करण्यात आल्या. फेºया रद्द झाल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
कंपनीतील अधिकाºयांशी संवाद साधला असता, नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, ‘एसटी महामंडळाकडून गेले दोन महिने शिवशाहीचे बिल मिळालेले नाही. यामुळे चालकांना वेतन कधी मिळणार, हा प्रश्न सतावत आहे. मात्र, लवकरच चालकांना वेतन देण्यात येईल’.
शिवशाहीच्या अन्य खासगी कंपनीशी संवाद साधला असता त्यांनीही महामंडळात शिवशाहीचे बिल देण्याबाबत अडचणी असल्याचे खासगीत मान्य केले.
शिवशाहीच्या खासगी चालकांचा संप तसेच रद्द केलेल्या प्रवाशांच्या परताव्याबाबत महामंडळाचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक रा. रा. पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधला; मात्र त्यांचा फोन व्यस्त होता. तर शिवशाहीचे विभागीय व्यवस्थापक एस. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी काही कल्पना नाही. माहिती घेऊन कळवतो, असे सांगितले.
कराराचे उल्लंघन
एसटीतील वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, कराराप्रमाणे वातानुकूलित बसचा डिझेल प्रतिलीटर ४ किलोमीटर अॅव्हरेज निश्चित करण्यात आला होता. मात्र, खासगी कंपनीच्या बस चालकांकडून याचे उल्लंघन होत आहे. डिझेलची रक्कम सुमारे ४० टक्के अधिक असल्याने बिलिंग करण्यात उशीर होत आहे.
शिवशाहीची सद्यस्थिती
महामंडळाच्या : ४६३
भाडेतत्त्वावरील (बैठ्या) : ३२५
भाडेतत्त्वावरील (शयनयान) : ५०
एकूण : ८३८