नागपूर: अपुऱ्या पावसामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारतर्फे आर्थिक मदत मिळावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले अाहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेचे विदर्भ प्रदेश संपर्क नेते व राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
रावते म्हणाले की, कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. पीकविमाही मिळालेला नाही. विदर्भ व मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून, यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली अाहे. आम्ही ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारणावर भर दिला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना सक्षमपणे उभी आहे. कर्जमाफीनंतरही राज्यात २५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.