नागपूर: खेळता-खेळता एका १५ वर्षीय गतिमंद मुलाचा लोखंडी साखळीने गळफास लागून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (ता.६) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. नीरजकुमार राधेश्याम बनतेला असे या मुलाचे नाव आहे. या प्रकाराने बनतेला परिवारात शोककळा पसरली आहे. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासी प्रकाश नगरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरजकुमार हा छत्तीसगड येथील गतिमंद मुलांच्या शाळेत शिकायचा. शाळेला सुटी लागल्याने २० एप्रिलला तो नागपुरात आईवडिलांकडे आला. दररोज तो दुपारी घरी राहत होता.
यादरम्यान त्याचे वडील राधेश्याम, आई आणि आजीही मजुरीच्या कामाला घराबाहेर जायचे. घटनेच्या दिवशी हे सगळे कामाला गेले होते. याशिवाय त्याची मोठी बहीणही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यावेळी नीरज हा वरच्या माळ्यावर खेळत होता.
१२ वाजता बहीण आणि त्यानंतर आजी घरी आली. नीरज खेळत असल्याने खेळताना गळफास लागून मृत्यू झाला होता. मात्र, बराच वेळ झाल्यावरही नीरजचा आवाज येत नसल्याने त्याच्या बहिणीने त्याला हाक मारली. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने तिने वर जाऊन बघितले असता, नीरजच्या गळ्याभोवती लोखंडी साखळी होती व तो बेशुद्ध असल्याचे आढळून आले.
तिने आरडाओरड केली. आजी आणि आजुबाजुच्या नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नियंत्रण कक्षातून याची माहिती कळमना पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यातून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. हेडकॉन्टेबल नरेश रेवतकर यांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.