नागपूर – रोजंदारीवर काम करणाऱ्या एका सामान्य मजुराला तब्बल 314 कोटी रुपयांची आयकर नोटीस मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मूळचे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्याचे रहिवासी आणि सध्या नागपूरमध्ये मजुरी करणारे चंद्रशेखर कोहाड यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.
कोहाड हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत असून, अशा प्रकारची नोटीस मिळाल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर नागपूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आयकर विभागाचा दावा आहे की, 2013-14 आर्थिक वर्षात चंद्रशेखर कोहाड यांनी हजारो कोटींचे व्यवहार केले, आणि त्यातील थकित कराची रक्कम एकट्या 314 कोटी रुपयांवर गेली आहे. मात्र, प्रत्यक्षात कोहाड हे हातावर पोट भरणारे सामान्य मजूर असून, त्यांच्या नावावर इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार होणे ही संशयास्पद बाब आहे.
या सगळ्या प्रकरणात काही मोठा आर्थिक घोटाळा किंवा कागदोपत्री फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. त्यामुळे चंद्रशेखर कोहाड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार सामान्य नागरिकांना भांबावून टाकणारा असून, प्रशासनाने तत्काळ या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे.
नागपूरच्या आयकर विभागाकडून कारवाईला सुरुवात-
नागपूरच्या आयकर विभागाने बैतूलमधील मुलताई नगरपालिकेकडे कोहाड यांच्या मालमत्तेबाबत माहिती मागवली होती. मात्र कोहाड यांच्या नावावर कोणतीही जमीन नोंदणीकृत नसून ती आमलाच्या देवठाण येथील रहिवासी राधेलाल किराड यांचा मुलगा मनोहर हरकचंद यांच्या नावावर आहे. कोहाड यांच्या नावावर कोणतीही जमीन नाही, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तशी माहिती त्यांनी आयकर विभागाला दिल्याचेही समोर आले आहे.
चंद्रशेखर कोहाड काय म्हणाले –
चंद्रशेखर कोहाड यांनी सांगितले की, त्यांची पत्नी गंभीर आजारी असून नोटीस मिळाल्यापासून संपूर्ण कुटुंब मानसिक तणावात आहे. ते स्वतः हृदयरोगी असून आयकर विभागाच्या या अनपेक्षित नोटीसमुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. तर चंद्रशेखर कोहाड यांनी हजारो कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. याचा आमच्याकडे पुरावा असल्याचे आयकर विभागाचं म्हणणं आहे. शिवाय कोहाड यांनी देखील चौकशीत अनेक गोष्टी कबूल केल्या आहेत असा दावा ही आयकर विभागाने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्वीस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.