नागपूर : राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरो म्हणजे NCRB ने एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालातून देशातील जेलमध्ये 2017 ते 2022 कालावधी 270 पेक्षा अधिक महिला कैद्यांवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोने सादर केलेल्या अहवालात सर्वाधिक बलात्काराच्या घटना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये घडल्या. कैदी महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये पोलिस, शासकीय नोकर, जेलचा स्टाप, रिमांड होम स्टाप यांचा समावेश आहे. या घृणास्पद कृत्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बलात्काराच्या घटनेमध्ये संशयित सापडलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेत कैदी महिलांवर बलात्कार केल्यास आरोपीवर 376 (2) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. तसेच एखाद्या उच्च पदावरील अधिकाऱ्याने हे कृत्य केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येते.
नुकतेच कोलकाता उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेत, पश्चिम बंगालच्या तुरुंगात 196 मुले जन्माला आली असल्याचे समोर आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर न्यायालयाने कैदी महिलांच्या तुरुंगात पुरुष कर्मचाऱ्यांच्या काम करण्यावर बंदी घातली आहे. तसेच या मुलांचे वडील कोण आहेत याचा देखील शोध घेण्याचे कठोर आदेश न्यायालयाने पोलीस प्रशासनाला दिले. या अहवालानंतर जेलमध्ये महिला कैद्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यासाठी पोलिसांमध्ये संवेदनशीलता आणि जगृतता निर्माण करण्याची गरज आहे.