नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नियमित वर्गात न येणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले आहे. मात्र असे असले तरी नागपुरात सीबीएसईच्या नियमांना केराची टोपली दाखवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.’नागपूर टुडे’च्या टीमने टॉप कोचिंग इन्स्टिट्यूट्सशी संवाद साधत स्टिंग ऑपरेशनद्वारे शहरातील काही डमी स्कूल्सच्या नावांचा पर्दाफाश केला. यावर आता नागपूरचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले शिक्षण उपसंचालक उल्हास नरड ?
‘नागपूर टुडे’शी बोलतांना उल्हास नरड म्हणाले की, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही तर शहरात सुरु असलेल्या डमी शाळांची मान्यता आम्ही कारवाई करून रद्द करणार आहोत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आता विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांनुसार शाळेत वर्गात नियमित हजेरी न लावणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा देता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत ‘डमी’ शाळांच्या व्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी करून घेणाऱ्या शाळांवर कडक कारवाई केली जाणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी वर्गामध्ये किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असेल, असेही ते म्हणाले.
कोचिंग सेंटर्सचे ‘या’ डमी स्कूलशी साटेलोटे –
शहरात विविध ठिकाणी कोचिंग हब उदयास आले आहेत. येथे बहुतेक जेईई आणि नीटची तयारी केली जाते. विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्यासाठी कोचिंग सेंटर्स डमी शाळा देतात.या कोचिंग इन्स्टिट्यूटचे या डमी शाळांशी साटेलोट असते.आकाश इन्स्टिट्यूटच्या सदस्यांशी संवाद साधला असता त्यांनी आम्हाला काही डमी स्कूलची नावेसांगितली.सेंट्रल स्कूल,सेंट झेवियर्स स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल,(लावा), दीनानाथ स्कूल, संचेती स्कूलशी आकाश इन्स्टिट्यूटचे टायअप असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकाराने आम्ही नागपुरातील प्रसिद्ध एलन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यांनीही आम्हाला सेंटर पॉइंटच्या तिन्ही ब्रांच, संचेती स्कूल, स्कूलऑफ स्कॉलर्सच्या चार ब्रांच, सेंट पॉल स्कूल आदी शाळांची नावे सांगितली.