नागपूर
: रस्त्यावर दुचाकी लावून गप्पा करणाऱ्या तरुणांना हटकले म्हणून त्यांनी कार चालकाचा पाठलाग करून त्याच्या घरी गोळीबार केला. यात प्रितेश राजू पाटील (वय २६) नामक तरुण गंभीर जखमी झाला. जरीपटक्यात रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
अहुजानगर हुडको कॉलनी येथील रहिवासी पलाश राजू पाटील रविवारी रात्री मिसाळ लेआउट मधून इको कारने घराकडे येत होता. रस्त्यात दहा ते पंधरा तरून दुचाकी रस्त्यावर लावून दंगामस्ती करत होते. पाटीलने त्यांना दुचाक्या बाजूला घ्या, असे म्हटले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. बाचाबाचीनंतर आरोपी आक्रमक झाल्याचे पाहून पाटीलने आपल्या घराचा मार्ग धरला
मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून हुडको कॉलनी गाठली. आरोपींनी आरडाओरड करीत पाटीलला शिवीगाळ केली. ती ऐकून पलाशचा भाऊ प्रितेश समोर आला. त्याने आरोपींना जाब विचारताच एकाने पिस्तुलातून दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी प्रीतेशच्या पोटाला चाटून केली. त्यामुळे तो जबर जखमी झाला. आरोपींनी तलवारीने दुचाकीच्या हेडलाईटवर फटका मारला आणि तोडफोड केली.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. आरोपी आरडाओरड करून शिवीगाळ करत होते. प्रसंगावधान राखून एकाने पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला. त्यानंतर पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी पळून गेले. जखमी रितेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मोठा जमाव जरीपटका पोलीस ठाण्यात पोहोचला. रात्री १ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस ताफा धावला
जरीटक्यात फायरिंग झाल्याची माहिती कळताच आजूबाजूच्या भागात गस्त करणारे पोलीस पथके तसेच गुन्हे शाखेचाही ताफा घटनास्थळी धावला. काही पोलीस अधिकाऱ्यांनी मेयोत धाव घेतली. हल्ला करणाऱ्यांपैकी एकाचे नाव उमेश ठाकरे असल्याचे सांगितले जात होते. वृत्तलिहिस्तोवर आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती.