नागपूर : मेयो हॉस्पिटल म्हणून ओळखले जाणारे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा नव्या कारणाने चर्चेत आले आहे. रूग्णालयात अँटी रेबीज लसचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना जीवनावश्यक महत्त्वाची औषधे बाहेरून खरेदी करण्यास सांगितले जात आहे. बँडेजसारख्या मूलभूत वापराच्या वस्तूही रुग्णांना बाहेरून मागवाव्या लागत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत माकड चावलेल्या ९ वर्षीय मुलीच्या वडिलांना मेयो रुग्णालयात उपचाराचा खर्च भागवण्यासाठी सुमारे 7,000 रुपये द्यावे लागले. त्याशिवाय, शस्त्रक्रियेदरम्यान कुटुंबाला आणखी तीन इंजेक्शन्स घेण्यास सांगण्यात आले.
शनिवारी माकडाने मुलीला चावल्याची घटना घडली. त्यामुळे मुलीला कामठीहून मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रभारी डॉक्टरांनी त्यांना बाहेरून 2,000 रुपये किमतीचे अँटी-रेबीज सिरम (इंजेक्शन) आणायला सांगितल्यावर मजूर म्हणून काम करणार्या त्यांच्या वडिलांना धक्काच बसला. शस्त्रक्रियेची गरज असल्याने डॉक्टरांनी रक्ताच्या काही चाचण्याही लिहून दिल्या.
रुग्णाच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार, एका खाजगी प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्याने IGGMCH वॉर्डमध्ये रक्ताचे नमुने गोळा केले आणि कुटुंबाला सर्व औषधे आणि उपभोग्य वस्तू खरेदी करण्यास सांगितले. रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी नागपूर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वसीम खान यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी या मुद्द्यावर अधिकाऱ्यांची चौकशी केली. खान यांनी रुग्णालयावर टीका केली आणि सरकारी रुग्णालयात मोफत औषधे आणि मूलभूत चाचण्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
या घटनेवरून सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयात सर्व रुग्णांना आवश्यक औषधे, उपभोग्य वस्तू आणि चाचण्या मोफत उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी सरकारने त्वरीत पावले उचलली पाहिजेत.