नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहर कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नागपूर हिंसाचारासंदर्भात सविस्तर माहिती दिल्यांनतर फडणवीस यांनी प्राशांत कोरटकर प्रकरणावरही भाष्य केले.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणारा प्रशांत कोरटकर याला कोणत्याही क्षणी पोलिसांकडून अटक होऊ शकते. मात्र कोरटकर हा आता दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल झाल्याने या चर्चांना उधाण आले. यावर फडणवीसांनी रोखठोक भूमिका घेतली.
फडणवीस म्हणाले, प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याचा दावा करण्यात येत असल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यात असे आहे की, कोणतीही शहानिशा न करता बातम्या चालवल्या जात आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की, तो दुबईला जावो की, अजून कुठेही जावो. पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील, असे मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले.