– प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली कारवाई
नागपूर : सावनेर तालुक्यातील बुरुजवाडा येथे मालू पेपर मिल्स लिमिटेड या रद्दीपासून कागद निर्माण करणाऱ्या कारखान्याला नियमाप्रमाणे प्रदूषण नियंत्रण न केल्या बद्दल कारणे दाखवा नोटीस राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाने यासंदर्भातील नोटीस बजावली आहे. रद्दीपासून कागद निर्माण करणाऱ्या या उद्योगाच्या बाष्पकाच्या चिमणीमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याची तक्रार प्रदूषण मंडळाकडे करण्यात आली होती. गावकऱ्यांच्या या तक्रारीसंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कोळशावर आधारित असलेला बॉयलर, प्रदूषणासंदर्भात आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची कमतरता या ठिकाणी आढळून आली.
यासंदर्भात खुलासा करण्याचे निर्देश सदर कंपनीला कारणे दाखवा नोटीसद्वारे देण्यात आले आहे. विभागीय आयुक्त ए. एम. खरे यांनी कालमर्यादेत यासंदर्भात खुलासा सादर करण्याचे स्पष्ट केले आहे.