Published On : Tue, Mar 28th, 2023
By Nagpur Today Nagpur News

ठाकरीबाणा दाखवा, कॉंग्रेसची साथ सोडा!

चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

नागपूर : “मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी तुम्ही काँग्रेस पक्षाकडे गेले. जर तुम्ही काँग्रेस पक्षाची साथ सोडली, तर संपूर्ण माझ्यासह महाराष्ट्र तुमचे अभिनंदन करेल.एकदा तरी ठाकरेपणा दाखवा काँग्रेस पक्षाची साथ सोडा, बाहेर पडा. फक्त सभेतूनच वल्गना करू नका,” असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले .

नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते. राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करीत आहेत. भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, असा उल्लेख करून श्री. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, ते मुख्यमंत्री असताना 50 वेळेला काँग्रेस पक्षांने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, टीका केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडले नाही. आता नुसतं तोंडाच्या वाफा काढू नका.

देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष मुख्यमंत्री होते. पण त्यांच्यावर एका पैशाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही. सत्तेतून पैसा मिळवायाचा ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धर्म आहे, त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलाय. त्यामुळे भ्रष्टाचारावर बोलणं किंवा भ्रष्टाचाराची भाषा करणं तुमच्या तोंडी शोभत नाही. तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुम्ही भ्रष्टाचारा केलाय. तुम्ही भ्रष्टाचारी आहात. तुमच्या बाजूला जे बसलेत तेही भ्रष्टाचारी आहेत, अशी टीका श्री बावनकुळे यांनी केली.

• पंतप्रधान मोदींशी तुलना नाहीच!
पंतप्रधान मोदींच्या नावाने मते मागवून दाखवा? माझ्या वडिलांच्या नावाने मते का मागताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावरही कुठं सूर्य आणि कुठे तुम्ही? असा प्रश्न श्री बावनकुळे यांनी केला ते म्हणाले, ते मोदींवर बोलतात. मोदींची बरोबरी तरी करू शकतात का? विश्वगौरव, युगपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. कशाला वल्गना करता? बघा तुम्ही 2024 काय होतंय ते पाहा?, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

• उरले सुरलेही येतील
खरंतर माझ्या कुळाचा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांना आनंद मिळत असेल तर त्यांनी खुशाल माझ्या कुळाचा उल्लेख करावा. पण पुढे काय होतंय ते बघावे. त्यांच्याकडे जे उरले सुरले आहेत, तेही आमच्याकडेच येतील. आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहोत. हिंदुत्वासाठी काम करत आहोत. तुम्ही पळपुटे आहात. आम्ही तुमच्या टीकेला भीक घालत नाही. भाजपचे सरकार 9 वर्षांपासून केंद्रात आहे एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप दाखवा. उद्धव ठाकरेचा एकच आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, उद्धव ठाकरेच भ्रष्टाचारी आहेत,असे श्री बावनकुळे म्हणाले.