नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे गांधीसागर तलाव येथे गुरूवारी (ता.२४) सकाळी ७ ते ९ या दरम्यान श्रमदान करण्यात आले. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचा यात विशेष सहभाग होता. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह आणि अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी संपूर्ण तलाव परिसराची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नगरसेवक प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षला साबळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, धंतोली झोनचे प्रभारी सहायक आयुक्त राजू भिवगडे, माजी नगरसेवक मनोज साबळे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेद्वारे गांधीसागर तलाव येथे स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याच्या कामाची झोननिहाय आखणी करण्यात आली असून प्रत्येक झोनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. तलावाच्या बाजूचा सर्व परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. तलावाच्या लगत असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटा, हे करताना तलावाचे सौंदर्य कायम राहील, याची विशेष काळजी घेण्यात यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
तलावाच्या लगत असलेल्या पायऱ्या आणि संरक्षक भिंत खचण्याच्या मार्गावर आहे. त्याची डागडुजी त्वरित करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तलावाच्या सभोवताल अवैधरित्या वाहने पार्किंग केली जातात. अवैध पार्किंग हटविण्याचे निर्देशही आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
गांधीसागर तलावाच्या काठावर साचलेला गाळ दिसल्याने आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. हा गाळ हा तातडीने काढण्यात यावा, आवश्यक असल्यास उपकरणांचा वापर करा, नाहीतर मनुष्यबळाचा वापर करून गाळ काढण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार यांना दिले.
तलावालगत असलेल्या भाऊजी पागे उद्यानाची आयुक्तांनी यावेळी पाहणी केली. अनावश्यक असलेली झाडे किंवा जी झाडे पडलेली आहे ती तातडीने काढून टाकावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. पुढील सात दिवस हे स्वच्छता अभियान कायम ठेवावे असे निर्देशही आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. तलावाच्या सभोवताल असलेले अतिक्रमणही काढण्यात यावे, असे निर्देश वीरेंद्र सिंह यांनी दिले.
यावेळी रमन विज्ञान केंद्राजवळ नेहरूनगर झोन सभापती राजेश कराडे, धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे, लक्ष्मीनगर झोनचे उपअभियंता रवींद्र मुळे, भाऊजी पागे उद्यानाजवळ सतरंजीपुरा झोनचे सहायक आय़ुक्त प्रकाश वराडे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, नातिक चौक ते टाटा पारसी शाळेजवळ स्थावर विभागाचे आर.एस.भुते आणि विभागाचे कर्मचारी, टिळक पुतळ्याजवळ गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, विभागीय अधिकारी सुरेश खरे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले.