नागपूर: नागपूर परिसरासह संपूर्ण विदर्भातील प्रख्यात व जागृत शक्तिपीठ असलेल्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी अॅड. मुकेश शर्मा यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड तीन वर्षासाठी करण्यात आली.
संस्थानचे मावळते अध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज संस्थानच्या कार्यालयात ही निवड करण्यात आली. निवडीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुकेश शर्मा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली व त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. तसेच अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्या स्वाधीन केली.
याचवेळी उपाध्यक्ष म्हणून प्रसिध्द उद्योजक अजय विजयवर्गी यांची निवड तर सचिव म्हणून मंदिराचे पुजारी केशवराव फुलझेले महाराज यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी बाबुराव भोयर तर सहसचिव म्हणून श्रीमती सुशीला मंत्री यांची निवड करण्यात आल्याचे मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषित केले.
या कार्यकारिणीत विश्वस्त म्हणून दयाराम तडसकर, प्रेमलाल पटेल, अशोक खानोरकर, नंदू बजाज, स्वामी निर्मलानंद महाराज, दत्तु समरितकर, श्रीमती नंदिनी त्रिपाठी, श्रीमती प्रभा निमोने यांची निवड झाली. हे सर्व जण तसेच मंदिराचे व्यवस्थापक पंकज चौधरी याप्रसंगी उपस्थित होते. विश्वस्त जी. डी. चन्ने आज अनुपस्थित होते.
कोराडी हे तीर्थक्षेत्रासह पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला होता. गेल्या तीन वर्षांपासून या क्षेत्राच्या विकास कार्याला सुरुवात झाली. या तीर्थक्षेत्राच्या विकासाचा प्रकल्प तयार करून शासनाकडून 185 कोटी रुपये बावनकुळे यांनी मंजूर करवून आणले. महाराष्ट्र शासन 80 टक्के आणि नासुप्र 20 टक्के अशा या प्रकल्पातील शासनाची हिस्सेदारी आहे. या विकास कामात महालक्ष्मी जगदंबा मंदिर संकुल, व्यापारी संकुल, पर्यटक स्वागत कक्ष, बस स्थानक, वाहनतळ असे मिळून 164.38 कोटी रुपयांची विकास कामे होत आहे. याशिवाय 24 कोटी रुपयांची कामे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. ही सर्व कामे मावळते अध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी सुरु झाली, हे येथे उल्लेखनीय.