एम्सचा स्थापना दिन समारंभ
नागपूर: आदिवासी व मागास भागात लहान मुलांना असलेल्या सिकलसेल व थॅलेसेमियावर एम्समध्ये उपचार व्हावे. कारण ÷मागास भागातील अनु. जाती, जमातीतील बालकांमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळत आहे. या रोगावर एम्समध्ये उपचार झाले तर गरीब रुग्णांची मोठी अडचण दूर होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
एम्स रुग्णालयाच्या स्थापना दिन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला एम्सच्या अधिष्ठाता डॉ. विभा गुप्ता व अन्य डॉक्टर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- सिकलसेल व थॅलेसेमियासोबतच अवयव प्रत्यारोपणाची सुविधाही या रुग्णालयात उपलब्ध झाली पाहिजे व गरिबांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. नागपूर हे मेडिकल हब झाले आहे. विदर्भ व शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातून दररोज रुग्ण नागपुरात येत आहेत. यात गरीब रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. बाहेरून येणार्या या रुग्णांच्या व्यवस्था नागपुरात होत नाहीत. या रुग्णांवर उपचार व त्यांच्यासाठी लागणार्या सुविधा येथे उपलब्ध झाल्या पाहिजेत.
गडचिरोली हा आदिवासी भाग आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना या भागात रुग्णसेवेसाठी पाठविले तर त्यांना खूप काही शिकता येईल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- शासनाच्या विविध विभागात अनेक प्रकारचे संशोधन सुरु असते. पण या विभागाचे त्या विभागाला काही कळत नाही.
या सर्व विभागांमध्ये समन्वय असला तर होणार्या संशोधनाचे लाभ जनतेला मिळू शकतील. आरोग्याच्या चांगल्या सुविधा जनतेला मिळाव्या असे प्रश्न एम्सने भविष्यात केले पाहिजे. करोनाच्या काळात एम्सने चांगले काम केले आहे. देशातील सर्वोत्कृष्ट व नंबर एकच हॉस्पिटल व्हावे अशी जनतेची अपेक्षा आहे. त्या अपेक्षा एम्सने पूर्ण कराव्या असेही ना. गडकरी म्हणाले.