नवी दिल्ली : इस्रोचे चांद्रयान-3 हे शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. विक्रम लँडरला मूळ यानापासून विलग करण्यात इस्रो यशस्वी झाले आहे. चंद्रयान-3 चंद्रावर उतरण्यापूर्वी इस्रोला मोठे यश मिळाले आहे. चांद्रयान-3 गुरुवारी दुपारी 1:08 वाजता दोन तुकड्यांमध्ये विभागले गेले आहे.
या प्रक्रियेदरम्यान चंद्रयान-3 चे प्रोपल्शन मोड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे केले गेले. आता विक्रम लँडर चंद्रापासून 100 किमी अंतरावर आहे. आता ते चंद्राच्या क्षेत्राभोवती फिरेल आणि हळूहळू लँडिंगच्या दिशेने जाऊन २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याचे लक्ष्य आहे. लँडर आणि प्रोपल्शन यशस्वीरित्या वेगळे करण्यात आल्याची घोषणा इस्रोने अधिकृत निवेदन जारी करून केली. आता शुक्रवारी दुपारी 4 वाजता, लँडर मॉड्यूल खालच्या कक्षेत डीबूस्ट केले जाईल.
चंद्राच्या दिशेने आता भारताचे प्रोपल्शन मॉड्यूल्स आहेत. म्हणजेच भारत चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या सज्ज झाल्याचे सांगण्यात येत आहे. द्रयान-३ चंद्रावर यशस्वीरित्या उतरले तर भारत चंद्रावर पोहोचणारा जगातील चौथा देश ठरेल. विशेष म्हणजे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे, जिथे आतापर्यंत कोणीही पोहोचलेले नाही. आजच्या विक्रम लँडरच्या विभाजनानंतर आता पुढचा आठवडाभर सर्वांचे लक्ष या चंद्रयान-3 च्या पुढच्या लक्ष्याकडे राहील.