नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी २०२४ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले. अनेक मोठ्या राजकीय घडामोडी यादरम्यान पाहायला मिळाल्या. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक अशा दोन्ही निवडणुका यावर्षी पार पडल्या. यादरम्यान कुणाला यश मिळाले तर कुणाला अपयशाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत महायुतील काहीसा फटका बसल्याचे चित्र होते. परिणामी, विधानसभा निवडणुकीत चित्र बदलले तर महायुतीला घवघवीत यश मिळाले. दरम्यान या राजकीय घडामोडीत नागपूर शहर केंद्रस्थानी होते. नागपूरकर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळाले तर नितीन गडकरी यांना पुन्हा केंद्रीय मंत्री पद मिळाले. तर नागपूर जिल्ह्यातून १२ आमदार निवडून आले.
लोकसभा निवडणुकीची घोषणा तर मविआची केली उल्लेखनीय कामगिरी-
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे पाच टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने उल्लेखनीय कामगिरी केली. तर महायुतीला मोठा फटका बसला होता.
नितीन गडकरी झाले पुन्हा केंद्रीय मंत्री –
विदर्भातील प्रतिष्ठेच्या असलेल्या नागपूर मतदारसंघामधून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला. यानंतर गडकरी यांना पुन्हा केंद्रात स्थान मिळाले. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एनडीएच्या 72 खासदारांनी मंत्रिपदाची आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी यांच्या शपथविधीनंतर खातेवाटपाबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे दावे केले जात होते. मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये कुणाला कोणतं खातं देण्यात येतं? याबाबत उत्सुकता होती. यादरम्यान केद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. यात नागपूरकर असलेले नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते विकास आणि परिवहन खाते देण्यात आले. गडकरी भाजपचे जेष्ठ आणि वजनदार नेते म्हणून ओळखले जातात.
मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा…; देवेंद्र फडणवीसांचे भाकीत ठरले खरे-
महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस ताकदीने परतले आहेत. आता महाराष्ट्राची कमान त्यांच्या हातात असेल. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे.देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा.ही ओळ २०१९ मध्ये फडणवीस यांनी म्हटली होती. ती प्रत्यक्षात खरी ठरल्याचे पाहायला मिळाले.
नागपूर जिल्ह्याला मिळाले १२ आमदार, सर्वाधिक आमदार भाजपचे-
विधानसभा निवडणुकीत नागपूरच्या 12 मतदारसंघातील अतिशय चुरशीच्या लढतीचे कल हाती आले. नागपूरच्या निकालाकडं राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. याच कारण म्हणजे, इथं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडधे पाटील, काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर वि. सलील देशमुख, कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयर (काँग्रेस) , विकास ठाकरे (काँग्रेस) विरुद्ध भाजपाचे सुधाकर कोहळे इत्यादींसह इतर नेते यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत सर्वांधिक आमदार भाजपचे होते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने मारली बाजी –
लोकसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर महायुतीसमोर विधानसभेचे मोठे आव्हान होते. २३ नोव्हेंबरला लागलेल्या निकालाने सर्वांनाच धक्का दिला. तर महायुतीने केलेल्या कामगिरीने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या निवडणुकीत महायुतीने तब्बल २३२ जागा मिळवत इतिहास रचला. यामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक १३२ ,शिवसेना शिंदे गटाने ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीने केवळ ४६ जागा जिंकल्या.
महाराष्ट्रात लोकसभेत महाविकास आघाडीला यश-
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला धूळ चारल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीला 31 (एका अपक्षाच्या पाठिंब्यासह) जागा मिळाल्या आणि दुसरीकडे भाजपाप्रणित ‘महायुती’ला 17 जागा मिळाल्या. 23 खासदार असलेल्या भाजपाची 9 जागांवर घसरगुंडी झाली होती.