नागपूर : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात रोज कोट्यवधींची गर्दी लोटत आहे. कुंभमेळ्यानिमित्त पवित्र गंगेत पाप धुण्यासाठी आणि डुबकी लगावण्यासाठी बरेच जण जात आहेत. असाच एक भाविक कुंभमेळ्यात पोहोचला, पण चोरीच्या पैशातून. या युवकाने नागपूरमधल्या एका घरातून लाखो रुपयांची चोरी केली. चोरीच्या याच पैशातून तो कुंभ मेळ्यात स्नान करायला आणि अयोध्येत दर्शनाला गेला.
नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं हे प्रकरण आहे. इकडे राहणारं सरोदे कुटुंब आपल्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेला होता, त्याचवेळी रजनीकांत केशव चानोरे नावाच्या युवकाने सरोदेंच्या घरात चोरी केली. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी लावलेले सीसीटीव्ही तपासले, यात आरोपी रजनीकांत दिसला. रजनीकांत हा मूळचा भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
कुंभमध्ये स्नान, अयोध्येलाही गेला
आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला ट्रेस करायला सुरूवात केली. चोरी केल्यानंतर रजनीकांत प्रयागराजला कुंभ स्नान करण्यासाठी पोहोचला. यानंतर तो अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी गेला. अयोध्येत दर्शन घेऊन रजनीकांत पुन्हा कुंभ मेळ्यात आला आणि स्नान करुन भोपाळमध्ये परतला. रजनीकांतचा पाठलाग करत नागपूर पोलीस भोपाळमध्ये पोहोचले आणि त्याला अटक करण्यात आली.
रजनीकांतने चोरीचं सोनं भंडारा शहरातल्या एका सराफा व्यापाऱ्याला विकलं आणि या पैशातून त्याने कुंभ मेळ्यात स्वत:चं पाप धुतलं. रजनीकांतने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी 130 ग्रॅम सोनं आणि 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रजनीकांतवर छत्तीसगड आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे इन्सपेक्टर ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी दिली आहे. रजनीकांतची गुन्हे करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. रजनीकांत आलिशान आयुष्य जगतो, त्याच्याकडे 2 लाख रुपयांचा मोबाईल, लक्झरी कार, ब्रॅण्डेड कपडे, घड्याळ आहे. तसंच तो जीम आणि महागड्या प्रोटीन पावडरचा शौकीन आहे. रजनीकांत लग्न घर किंवा पॉश एरियातील घरातलं सोनं चोरी करतो.