नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला जनतेसाठी खुला राहणार आहे. ओळखीचा पुरावा सादर करून किल्ल्यात प्रवेश रेल्वे स्टेशनसमोरील आर्मी रिक्रूटिंग ऑफिस गेटमधून देण्यात येईल. असे रत्नाकर सिंग, ग्रुप कॅप्टन, डिफेन्स पीआरओ, नागपूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
नागपूर शहरात रेल्वे स्टेशनपासून जवळच सीताबर्डीचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या परिसरात इसवीसन १८१७ मध्ये नागपूरकर भोसले आणि इंग्रज यांच्या मध्ये लढाई झाली होती. सिताबर्डीचा किल्ला आर्मीच्या (११८ इंफ़ेंट्री बटालियनच्या) ताब्यात असल्यामुळे तो फ़क्त २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्ट याच दिवशी सामान्य पर्यटकांसाठी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० खुला असतो. पण या तीनही दिवशी किल्ला पाहाण्यासाठी तुफ़ान गर्दी असते.
अक्षरश: धक्काबुक्की करत किल्ल्यावर फ़िरावे लागते. किल्ला ब्रिटीश आर्मी आणि नंतर भारतीय आर्मीच्या ११८ इंफ़ेंट्री बटालियनच्या अख्यातरीत असल्याने किल्ल्याचे अनेक भाग पाहाता येत नाहीत. किल्ला इतके वर्षे सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे मुळ किल्ल्यात आणि त्यावरील वरील वास्तूंमध्ये सोयीप्रमाणे बदल केलेले आहेत.