मुंबई: नागपूर ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने सहा नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पोलिस ठाण्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांचीही उपस्थिती होती.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, वडोदा, बाजारगांव, मोहपा, पाचगाव, नांद आणि कान्होली बारा या सहा ठिकाणी नवीन पोलिस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. या नवीन पोलिस ठाण्यांमुळे ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना राबवता येणार आहेत. नागपूर ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना तात्काळ सहकार्य मिळण्यासाठी पोलिस ठाण्यांची गरज होती. आम्ही या प्रकल्पाला प्राधान्य देत आहोत आणि या प्रक्रियेला वेग देण्यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. आमचे लक्ष्य हे पोलिस ठाणे लवकरात लवकर कार्यरत करणे आहे, जेणेकरून स्थानिक पातळीवर कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.
मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
गुन्हेगारी रोखण्यास होणार मदत
नवीन पोलिस ठाण्यांमुळे गावांमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा भाव वाढेल. नागपूर ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्थेसाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल. महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकार्यांना या प्रकल्पाला प्राधान्य देऊन काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.