नागपूर: सद्यस्थितीला उपराजधानीतील सर्वात स्मार्ट तहसील, सोनेगाव आणि यशोधरानगर पोलीस ठाणे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच शहरातील मान्यवरांच्या समितीने केलेल्या पोलीस ठाण्याच्या सर्वेक्षणातून हा अहवाल तयार झाला असून, तो आज गुरुवारी जाहीर करण्यात आला. पोलीस उपायुक्त एस. चैतन्य, उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि सहायक आयुक्त रिना जनबंधू यांनी ही माहिती गुरुवारी पत्रकारांना दिली.
पोलीस ठाण्यातील अस्तव्यस्त कारभार, तेथील कोंदट वातावरण, रुक्षपणा पाहून कोणत्याच पोलीस ठाण्यात जाण्याची-बसण्याची कुणाची इच्छा होत नव्हती. ते ध्यानात घेत पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी उपराजधानीत स्मार्ट सिटी पोलीस स्टेशन हा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार, प्रत्येक पोलीस ठाण्याचा परिसर अंतर्बाह्य सुंदर, सुशोभित करण्यावर भर देण्यात आला. पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची रचना बदलून आवश्यक त्याठिकाणी बांधकाम करण्यात आले. स्वागतकक्ष, लॉकअप, स्वच्छतागृह इत्यादी सोयीसुविधा चांगल्या करण्यात आल्या आणि ठाण्याचे आधुनिकीकरणही करण्यात आले. हे करतानाच जे पोलीस स्टेशन सर्वात चांगले त्याला पुरस्कार देण्याची घोषणा आयुक्तांनी केली होती. त्यानुसार शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या आधुनिकीकरण आणि सुशोभिकरणाचे काम सुरू झाले अन् आता या सर्व ठाण्यांचा चेहरामोहरा बदलला. त्याचे मूल्यांकन करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. समितीत वास्तुविशारद तज्ज्ञ, स्मिता गायधने, संजीव शर्मा यांच्यासह अन्य काही सदस्यांचा समावेश होता. सदर मूल्यांकन समितीने शहरातील सर्व पोलीस स्टेशनला पूर्वसूचना न देता अचानक भेटी दिल्या. पोलीस स्टेशनच्या इमारत परिसराचे तसेच तेथील कार्यपद्धतीचे मूल्यांकन करण्यात आले.
जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून तयार करण्यात आलेले पोलीस स्टेशन, स्वत:च्या इमारती असणारे पोलीस स्टेशन आणि किरायाच्या इमारतीत असणारे पोलीस स्टेशन अशा तीन प्रकारात विभागणी करून स्मार्ट ठाण्याच्या पुरस्कारासाठी पोलीस स्टेशनची इमारत व रचना, परिसर, कार्यपद्धती तसेच तेथे उपलब्ध भौतिक सोयीसुविधा असे निवडीचे चार निकष लावण्यात आले.
या निकषावर समितीने पोलीस स्टेशनचे मूल्यांकन केले. समितीच्या अहवालाप्रमाणे जिल्हा नियोजन व विकास निधीतून तयार केलेले स्मार्ट पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक तहसील ठाण्याने, द्वितीय क्रमांक सक्करदराने मिळवला.
शासकीय इमारतीतील स्मार्ट पोलीस स्टेशन गटात प्रथम क्रमांक सोनेगाव, द्वितीय क्रमांक अजनी तर किरायाच्या इमारतीत असणारे स्मार्ट पोलीस स्टेशन प्रथम क्रमांक यशोधरानगर, द्वितीय क्रमांक वाडी ठाण्याला मिळाला.
गणराज्यदिनी पुरस्कार
निवड झालेल्या ठाण्याच्या ठाणेदारांना गणराज्यदिनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कृत केले जाणार आहे.