नई दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचे खाते काढून घेण्यात आले असून त्यांच्या जागी राज्यवर्धन राठोड यांची वर्णी लागली आहे. राज्यवर्धन राठोड हे केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत. त्यांची वर्णी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रीपदी लागली आहे. त्यांच्याकडे क्रीडा खात्यासह माहिती आणि प्रसारण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. अर्थमंत्री अरूण जेटलींकडून अर्थ खाते तात्पुरते काढण्यात आले असून अर्थ खात्याची जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे. अरूण जेटली यांची प्रकृती सुधारेपर्यंत पियुष गोयल सांभाळणार आहेत. तर स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग खातेच राहणार आहे
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर आज (दि.१४ मे) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. रूग्णालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. जेटली (वय ६५) शनिवारी (दि.१२) रूग्णालयात दाखल झाले होते. मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेले जेटली मागील एक महिन्यांपासून डायलिसिसवर आहेत. त्याचमुळे अर्थ खात्याची जबाबदारी आता रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे. अरूण जेटली यांची प्रकृती सुधारेपर्यंत पियुष गोयल अर्थ खात्याचा पदभार सांभाळतील.
मंत्रिमंडळातले फेरबदल हा स्मृती इराणींसाठी मोठा झटका आहे. कारण याआधीही त्यांच्याकडे असलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाही काढून घेण्यात आले. आता त्यांच्याकडे माहिती प्रसारण खाते काढूनही इराणी या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.