Published On : Fri, May 18th, 2018

जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत ११ हजार गावे दुष्काळमुक्त

Advertisement

सांगली : महाराष्टाला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा डोंगर परिसरात पाणी फाउंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून त्यांनी श्रमदान केले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्याचा ५० टक्के भाग दुष्काळाने होरपळत होता. या दुष्काळग्रस्त भागाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या धरणांच्या बरोबरीने जलसंधारणाच्या प्रणालीद्वारे ही गावे दुष्काळमुक्त करण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढविल्याने लोकांना ही कामे आपली वाटू लागली आहेत. त्यामुळे गावागावात जलसाठे निर्माण होऊ लागले. राजकारण, गट-तट बाजूला सारुन लोक पाण्यासाठी एकत्र येऊ लागली आहेत. गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब गावाच्या मालकीचा आहे, ही मानसिकता गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून जलसंधारणाच्या कामात निसर्गाला समजावून घेऊन गावकऱ्यांनी काम केल्याने दुष्काळमुक्तीचा मार्ग सुकर झाला आहे.

पाणी फाउंडेशनने दुष्काळमुक्तीसाठी हाती घेतलेल्या कामाचे कौतुक करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाणी फाउंडेशनने वैज्ञानिक दृष्टिकोनातून जलसंधारणाचे मॉडेल तयार करून या कामात गावागावांचा सहभाग घेतला. त्यामुळे अनेक गावात जलसंधारणाची क्रांतीकारी लोकचळवळ उभी राहिली आहे. आज गावाचा धर्म, जात, पार्टी, गट या सर्वांचे ध्येय केवळ पाणी झाले आहे. सर्वजण एकदिलाने, एकजुटीने पाण्यासाठीच काम करीत आहेत, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वार्थाने अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सारे आवंढी गाव जलसंधारणाच्या कामासाठी मैदानात उतरले असून दुष्काळ पराजित होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. गेल्या ५० वर्षात होऊ न शकलेले काम केवळ एका वर्षात आवंढीकरांनी केले आहे. पाण्याचे शास्त्र समजून घेऊन निसर्गाच्या वाटा शोधून जलसंधारणाचे काम केले, हे राज्याला दिशादर्शक आहे, असा गौरवही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. आवंढीच्या गावकऱ्यांकडून केलेले जलसंधारणाचे काम लाखमोलाचे असून गेल्या ४५ दिवसापासून अथक मेहनत करणाऱ्या गावकऱ्यांसमवेत काही वेळ श्रमदान करता आले याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.

पाणी आहे तिथे जीवन आहे. पाणी आहे तिथे समृद्धी आहे. अशी पाणीदार समृद्धी गावकऱ्यांच्या ताकदीतून निर्माण करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाणी फाउंडेशनबरोबरच जैन संघटनेने जलसंधारणाच्या कामासाठी केलेले सहकार्य कौतुकाचे आहे. पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी सहभाग घेतलेल्या गावांना विशेषत: आवंढी गावकऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आवंढी येथील जलयुक्त शिवारच्या कामाच्या अनुषंगाने डिझेल संदर्भातील प्रश्न निश्चितपणे दूर करू. जलसंधारणाचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आवंढीकरांची एकजूट दुष्काळमुक्तीसाठी उपयुक्त असून राज्याच्या इतर गावांना ती प्रेरणादायी असल्याचा गौरवही त्यांनी यावेळी केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांसमवेत जलंधारणाच्या कामामध्ये श्रमदान केले. त्यामुळे काम करणाऱ्या गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधला व पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची माहिती घेतली.

सरपंच अण्णासाहेब कोडग यांनी मान्यवरांचे स्वागत केले व भटकीमळा परिसरात सुरू असलेल्या जलसंधारण कामांची माहिती दिली. ते म्हणाले, आवंढी गावात आज भटकीमळा येथे ४० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाचे काम सुरू असून त्यामध्ये कंपार्टमेंट बंडींग, सीसीटी, डीप सीसीटी, मातीनाला बांध, दगडी बांध अशी जलसंधारणाच्या माथा ते पायथा जलसंधारण प्रणाली राबविल्याची माहिती दिली.

समारंभास माजी महापौर सुरेश पाटील, नीता केळकर, जैन संघटनेचे जिल्हा प्रमुख राजगोंडा पाटील, पाणी फौंडेशनचे जिल्ह्याचे प्रमुख सत्यवान देशमुख, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, तहसिलदार अभिजीत पाटील, उपसरपंच प्रदिप कोडग यांच्यासह आवंढी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement