Published On : Tue, Feb 6th, 2018

कर्जमाफीचा आतापर्यंत ३१ लाख शेतकऱ्यांना लाभ

मुंबई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंअंतर्गत आतापर्यंत ३१ लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी दिली.

मंत्रालयात श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक संपन्न झाली.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या योजनेंतर्गत दाखल झालेल्या अर्जातील 47.73 लाख खात्यावर (Green List) कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ मंजूर केला असून त्यासाठी सुमारे 23 हजार 102 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 5 फेब्रुवारी अखेर 31.32 लाख कर्ज खात्यांवर लाभापोटी 12 हजार 362 कोटीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. मंजूर करण्यात आलेल्या एकूण 47.73 लाख कर्ज खात्यांपैकी बँकांकडून काही खात्यावरील माहिती अद्ययावत करुन पुन:श्च पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची माहिती व बँक खात्यांची माहिती यांची पडताळणी केली असता जी कर्ज खाती योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा एकूण 4.77 लाख (Yellow List) कर्ज खात्यांबाबतची माहिती पोर्टलद्वारे बँकांना पडताळणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. अशा कर्ज खात्यांची पडताळणी बँकांमार्फत करण्यात आली असून सुमारे १ लाख ७५ हजार खात्यांची तपासणी करुन फेर प्रक्रियेसाठी ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे.

योजनेमध्ये अर्ज दाखल केलेल्या ज्या शेतकऱ्यांची माहिती बँकेकडील माहितीशी जुळली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यांच्या माहितीची शहानिशा करुन निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या असून अशा तालुकास्तरीय समितीद्वारे निर्णय प्रक्रियेसाठी 21.69 लाख कर्जखाती (unmatch application data) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. यापैकी बँकांनी काल दि. 5 फेब्रुवारी अखेर एकूण 5.65 लाख खात्यांची माहिती अपलोड केलेली आहे. या खात्यांबद्दलची नमुना १ ते ६६ मध्ये भरलेली माहिती बँकांनी पोर्टलवर पात्र/अपात्रतेसह नोंद करुन अपलोड करावयाची असून त्यानंतर अशा खात्यांबाबत मंजूर/नामंजूरीचे निर्णय घेऊन पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही तालुकास्तरीय समितीमार्फत चालू आहे. तसेच या योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या अथवा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी/गाऱ्हाणी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची कार्यप्रणाली तयार करण्याचे काम चालू असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी यावेळी दिली.

देशातील सर्वात मोठी कर्जमाफी राज्य सरकारने केली मात्र त्याबाबत शंका उपस्थित होऊ नये यासाठी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे देण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस.एस. संधू यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Advertisement