मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी उचलून धरला आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली.
यावरून विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना घेरले. विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंसमोर हात का जोडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान आदित्य ठाकरेंमध्ये काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आज आमदार असले तरी त्यांच्याकडून सतीश सालियान यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो असेही त्यांनी म्हटले. आदित्य ठाकरे स्वत:ला निर्दोष समजत असतील तर त्यांनी थेट त्या दिवशीचे त्यांनी मोबाईल नेटवर्क लोकेशन शेअर करावे असे आव्हान नितेश राणे यांनी दिले. बलात्काराचा आरोप असलेल्यांना तात्काळ अटक करावी असा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा आहे. त्यानुसार, कारवाई झाली पाहिजे अशी मागणीदेखील त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासमोर हात जोडले होते. माझा मुलगा चुकला, आता प्रकरण ताणू नका. तुम्हालाही दोन मुले आहेत, असे उद्धव यांनी नारायण राणे यांना सांगितले असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला.
ही गोष्ट नारायण राणे यांनी ऑन रेकॉर्ड सांगितल्याचे स्मरण नितेश राणे यांनी करून दिले. जर आदित्यने काही केले नाही तर उद्धव यांनी नारायण राणेंसमोर हात का जोडले असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.