बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन.
नागपूर: सोशल मिडियाच्या वापरातून आता आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु पुरेसे ज्ञान नसल्याने अनेकदा सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत असल्याचेही अनेक प्रकार पुढे येत आहे. नागरिकांत याबाबत जनजागृती करण्यासाठी नागपुरात प्रथमच सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी सोशल मिडिया जनजागृती रथ तयार केला. माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या रथाचे लोकार्पण केले.
फेसबुक, इन्स्टाग्रामपुरताच सोशल मिडिया नसून त्याच्या कक्षा रुंदावल्या आहे. आज प्रत्येक दुसरा व्यक्ती यातून आर्थिक देवाण-घेवाणही करीत आहे. सोशल मिडिया हाताळणे, त्यामुळे होणारे फायदे, नुकसान याबाबत गेल्या पंधरा वर्षांपासून सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. आतापर्यंत शिबिरातून जनजागृती करणारे पारसे यांनी आता प्रत्येक वस्ती व घरापर्यंत जनजागृती करण्यासाठी सोशल मिडिया जनजागृती रथ तयार केला. या जनजागृती रथाचे कोराडी येथे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज लोकापर्ण करण्यात आले. यावेळी त्यांनी जनजागृतीसाठी माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन केले. मध्य भारतातील पहिला सोशल मिडिया जनजागृती रथ आजपासून जनतेच्या समर्पित केला असून नागरिकांनी पारसे यांच्याशी संपर्क करून वस्त्यांमध्ये जनजागृतीसाठी या रथाचा वापर करता येईल, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. पारसे यांच्या या उपक्रमाचा नागरिकांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वासही त्यांंनी व्यक्त केला.
ऑनलाईन पेमेंट असो की भावना लोकापर्यंत पोहोचविण्याचे काम असो, सोशल मिडिया आज प्रत्येकाची गरज आहे. परंतु आर्थिक व्यवहारादरम्यान फसवणूक झाल्यानंतर सोशल मिडियाबाबत अज्ञान स्पष्ट होते. जनजागृती रथामध्ये प्रोजेक्टर आदीची सुविधा असून कुठल्याही वस्त्यांमध्ये सोशल मिडियाबाबत जनजागृती करण्यासाठी हा रथ तयार करण्यात आला.
– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.ajeetparse.com