कोरोनाबाबत चेष्टा, मस्करी, नकारात्मक पोस्टवरच भर.सर्व सामुदायिक प्रयत्नांची गरज !
नागपूर: संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाबाबत सोशल मिडियावरील नेटीझन्स अजूनही गंभीर नसल्याचे चित्र आहे. प्रत्येकाच्या दारापर्यंत येऊन कोरोना आव्हान देत आहेत. मात्र नेटीझन्सच्या पोस्ट बघितल्यास आवाहन करणाऱ्या मोठ्या नेत्यांपासून अधिकाऱ्यांची चेष्टा, मस्करीच सुरू असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाविरुद्ध लढ्यात सरकारी यंत्रणा, पोलिस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते जबाबदारीने योगदान देत आहेत. काही सुज्ञ नागरिकही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. मात्र काहीजण सोशल मिडियावर नकारात्मक पोस्ट टाकून केलेल्या उपाययोजनांनाच आव्हान देत असल्याचा निष्कर्ष सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नोंदविला आहे. विशेष म्हणजे प्रशासनाचे आवाहन, उपक्रमांची टर उडविणारी टोळीच सोशल मिडियावर दिसून येत आहे.
आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे एकप्रकारे खच्चीकरण करण्याचाच प्रकार सुरू आहे. काही समाजविघातक मानसिक नकारात्मकता वाढविणारे व्हीडीओ, पोस्ट टाकून कोरोनाविरुद्धचा लढ्याचा मार्ग आणखी अवघड करीत असल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनच्या काळात एकमेकांना धैर्य देण्याची गरज आहे. फेक व्हीडीओ, अफवा पसरविणारी माहिती, पोलिस व जिल्हा प्रशासनाची टर उडविणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत रितसर तक्रार करण्याची गरज आहे.
या काळात सकारात्मक पोस्टसह जिल्हा प्रशासन, डॉक्टर, पोलिसांच्या मागे उभे राहून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या आवश्यकतेवर पारसे यांनी भर दिला. मानसिकरित्या खच्चीकरण करणाऱ्या पोस्ट टाळून तसेच त्याला प्रतिसाद न देता नेटीझन्सनी कोरोनाबाबत गांभीर्य दाखवून सामाजिक जबाबदारीचे भान राखण्याची गरजही व्यक्त करण्यात येत आहे.
” लॉकडाऊन संपण्याच्या ” संदर्भात अनेक तथ्यहीन चर्चा , घोषणा , अंदाज वर्तवणारे ऑडिओ , विडिओ , पोस्ट यायला सुरवात झाली आहे . कृपया कोणत्याही अनधिकृत घोषणा , माहिती व आपल्या संयमाचा बांध तोडणाऱ्या भ्रामक , तथ्यहीन पोस्ट , बातमी वर विश्वास ठेऊ नका , फॉरवर्ड करू नका . आपल्या सर्वांच्या भगीरथ प्रयत्नांनीच आपण कोरोना व्हायरस संक्रमणाला थोपवून धरू शकतोय . ज्या भाषेत प्रश्न – त्या भाषेत उत्तर . सोशल मीडिया चा वापर करून सामाजिक स्वास्थ्य खराब करणाऱ्यांना सोशल मीडिया द्वारेच आटोक्यात आणू , स्टे सेफ – स्टे होम ! कोणत्याही भ्रामक , अफवा – तथ्यहीन पोस्ट्स , मेसेजेस आणि माहितीची तक्रार नोंदवा . शासन , पोलीस खाते , वैद्यकीय यंत्रणा , सर्व सफाई कर्मचारी – महानगर पालिका आपल्या सोबत आहेतच .
सोशल मिडियावरून नकारात्मक पोस्ट टाकून सरकारच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचे काम सुरू आहे. कोरोनाशी संघर्ष करीत असतानाच काही समाजविघातकांकडून ‘सोशल मिडिया वॉरिअर्स फॉर डिस्ट्रक्शन’ या विकृत संकल्पेचा वापर केला जात आहे. नागरिकांनी हे प्रयत्न हाणून पाडत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावे
– अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक.