भावनिकरित्याही गुंतवून ठेवले नागरिकांना, अस्वस्थतेवर अनेकांची मात.
नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे घरांमध्येच अडकून पडलेल्या नागरिकांना सोशल मिडियाने मोठा आधार दिला आहे. प्रत्येकजण सोशल मिडियावर घरांमधील गमती-जमती पोस्ट करीत असून त्यांचे आप्त, मित्र त्यावर कमेंट करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकप्रकारे सोशल मिडियाने नागरिकांना मानसिकरित्या सुदृढ करण्याचे काम केलेच, शिवाय भावनिकरित्या गुंतवून ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलला. एवढेच नव्हे तर लोकांत ऑफलाईन फूट पाडणाऱ्यांचे प्रयत्नही सोशल मिडिया ने ऑनलाईन हाणून पाडले.
तासनतास घराबाहेर राहण्याची सवय जडलेले नागरिक आता केवळ जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहे. हे एक-दोन तास सोडले तर दिवसातील 22 तास घरांमध्येच राहावे लागत आहे. काही काळ टीव्हीपुढे बसल्यानंतर अनेकजण सोशल मिडियावर वेळ घालवित आहेत. सोशल मिडियाच्याविरुद्ध भूमिका घेणाऱ्यांनाही आता सोशल मिडियाचे महत्त्व पटल्याचा निष्कर्ष सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नोंदविला. दिवस-रात्र व्यवसाय, नोकरीत मग्न असणारी पुरुष मंडळी सध्या घरात असून अनेकांची पाककृतीची प्रतिभा बहरलेली असल्याचे त्यांच्या पोस्टवरून दिसून येत आहे.
त्यांच्यावर कुटुंबातून तसेच मित्रांतून सोशल मिडियावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याने त्यांच्यातील सकारात्मकता कायम आहे. आता घरांमध्येच सर्व कुटुंब एकत्र असल्याने अनेक गमती-जमतीही होत आहे. व्यंग, काव्य, कधी काळी असलेली लेखनाची आवड आता पुन्हा नव्या जोमाने बहरत आहे. कुणी गायन तर कुणी तबला, बासरी आदीची प्रतिभा सोशल मिडियावर दाखवित आहे. फेसबुक, इन्स्ट्राग्राम, ट्विटर हे सोशल मिडियाचे व्यासपीठ प्रतिभावंतांसाठी वरदानच ठरले आहे. त्यातून काही चांगल्या पोस्ट सोशल मिडियावर झळकत आहे. यात काही विनोदी पोस्ट असल्या तरी काही भावनांना वाट मोकळ्या करून देणाऱ्याही पोस्ट झळकत आहे.
सोशल मिडियावर डॉक्टर्स, पोलिसांचा त्याग, व सफाई कर्मचारी त्यांच्यापासून दुरावलेले कुटुंब, अशा अनेक भावनिक पोस्ट दिसून येत आहे. नागरिकांकडून डॉक्टर्स, पोलिस, सफाई कर्मचारी यांना मोठे समर्थन मिळत असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढले आहे.
कोरोनाविरुद्ध संपूर्ण देश आज एकत्र आला आहे. सिनेकलावंत, उद्योजक मोठ्या प्रमाणात मदत करीत असून सोशल मिडियावर त्यांचे कार्य इतरांनाही प्रेरक ठरत आहे. ज्येष्ठ नागरिकही सोशल मिडियाचा वापर करीत असून ‘जनरेशन गॅप’ही मिटत आहे. सोशल मिडिया सध्या राष्ट्रभक्तीचेही मोठे व्यासपीठ ठरले असून बहुपक्षीप संवादामुळे नकारात्मक उर्जाही नष्ट करणारे साधन ठरले आहे.
– अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक.