शंका घेणारे तोंडघशी, सेनेच्या सन्मान पंजाबच्या पथ्यावर.
नागपूर: सोशल मिडियावर सर्वत्र राष्ट्रवादाची पकड मजबूत झाल्याचे स्पष्ट होत आहे. नुकताच पार पडलेल्या निवडणुकीने सोशल मिडियावरील चित्र बदलले असून राष्ट्रवादावर शंका उपस्थित करणाऱ्या पक्षांना अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र, त्याचवेळी पंजाबमध्ये सेनेची कामगिरी, त्यांचे कौतुक करीत राष्ट्रवादाची कास धरल्याने देशात पाणीपत झालेल्या पक्षाला यश मिळाले. सोशल मिडियावरील राष्ट्रवादाच्या पोस्ट पक्षांच्या यश-अपयश निश्चित करणाऱ्या ठरत असल्याचे सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नमुद केले.
लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांत पराभवावर मंथन सुरू झाले आहे. नेते, विरोधी आघाडीतील पक्ष एकमेकांवर खापर फोडत आहे. मात्र, पराभवाच्या मूळ कारणावर अद्यापही एकही पक्ष पोहोचल्याचे दिसत नसल्याचे पारसे यांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान सोशल मिडियावरून जनतेच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दुखावल्या गेल्याने विरोधकांना पराभवाचा जबर धक्का बसला. सोशल मिडियावरून पुलवामा घटना, त्यानंतर केलेले हवाई हल्ले, विंग कमांडर अभिनंदन यांचे हस्तांतरणावरून विरोधकांनी शंका निर्माण करण्यात आल्या.
सत्ताधाऱ्यांवर प्रहार करताना एकप्रकारे सेनेच्या कर्तृत्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या नकारात्मक पोस्ट टाकण्यात आल्या. आपल्या देशात सैन्याचा मान ही भावनिक बाब आहे. नेमके याच बाबत नकारात्मकता पेरण्यात आली. त्यामुळे राजस्थान, बिहारमध्ये सत्ता असूनही तेथे मोठा पराभव पत्करावा लागला. पश्चिम बंगालमध्येही तेच झाले. याउलट पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रवादाची कास धरली. तेथे सैन्यांच्या कामगिरीवर शंका घेतली नाही.
सोशल मिडियाच्या माध्यमातून सैन्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यामुळे देशात सर्वच ठिकाणी पाणीपत झालेल्या पक्षाला पंजाबमध्ये यश मिळाले. पक्षीय राजकारणाला तिलांजली देत सेनेच्या कामगिरीला, राष्ट्रवादाला जनतेने डोक्यावर घेतले. देशप्रेमाला जनतेने निवडले. मात्र, याबाबत कुणीही विचार करताना दिसून येत नाही. सोशल मिडियावर राष्ट्रीयत्त्वाची प्रखर ज्योत तेवत ठेवल्याने जातपात, धर्माची दरी ओलांडून जनतेने मागील सत्ताधाऱ्यांनाच पुन्हा संधी दिली. देशातील स्वातंत्र्य लढ्यातील पक्षाकडे लोकमान्य टिळक, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, लाला लजपत रॉय ते लाल बहादूर शास्त्रीपर्यंत राष्ट्रवादाला मानणारे नेत्यांचे कार्यकर्तृत्व असताना या पक्षाला जनतेचा राष्ट्रवाद दुखावणे योग्य का वाटले, हा कळीचा मुद्दा असल्याचे पारसे म्हणाले.
सोशल मिडियावर नागरिकांचा प्रखर राष्ट्रवाद दिसून येत आहे. मात्र, विरोधकांनी यावरच शंका निर्माण केली. त्याचे प्रत्युत्तर जनतेने दिले. ही चूक सुधारण्याची पराभूत पक्षांना संधी आहे. मात्र, हा महत्त्वाचा विषय सोडून ईव्हीएम, पक्षातील दुबळे नेते, कार्यकर्त्यांची फळी यावरच उर्जा खर्च केली जात आहे. पुन्हा नकारात्मक दिशेने पराभूत पक्ष जात आहे.
– अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक.