ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सामाजिक जाणीव असलेला अभिनेता हरपल्याची शोकभावना माजी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली आहे.
मराठी नाटक, मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या बहारदार अभिनयशैलीने विक्रम गोखले यांनी छाप सोडली आहे. घरातून मिळालेल्या अभिनयाच्या वारस्यासोबतच सामाजिक दायित्वांची जाणीवही त्यांनी जोपासली. विक्रम गोखले या अभिनयसम्राटाची कलाकीर्द जितकी, तितकीच प्रखर त्यांची सामाजिक जाणीव होती.
अतिशय परिणामकारक देहबोलीनं आणि अफलातून वाचिक अभिनयानं ते प्रेक्षकाला खिळवून ठेवत. विक्रम गोखले हे केवळ असामान्य कलाकारच नव्हते, तर उत्तम माणूस आणि सामाजिकतेचं भान राखणारे एक सुजाण नागरिक म्हणून त्यांनी आपली ओळख जनमानसावर उमटवली होती.
त्यांचे निधन हे अभिनय क्षेत्राचेच नव्हे तर सामाजिक क्षेत्राचीही अपरिमित हानी असल्याचे माजी महापौर संदीप जोशी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.