नागपूर: प्रभाग क्र २७ मधील सुदामपुरी, भांडे प्लॉट परिसरातील ज्या भागात पाण्याचा वेग कमी आहे तेथे पाण्याचा वेग वाढवा आणि तीन दिवसांत आवश्यक त्या उपाययोजना करून नियमित पाणी द्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सुदामपुरी परिसरातील काही भागात अनेक दिवसांपासून पाणी नाही. पाणी आले तर त्याचा फोर्स कमी असतो. कमी वेळ पाणी पुरवठा असतो, टँकर नियमित येत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि नगरसेविका दिव्या धुरडे यांच्या विनंतीवरून महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, झोन सभापती रिता मुळे, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, माजी नगरसेविका ताराबाई नखाते, ओसीडब्ल्यूचे राजेश कालरा उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी महापौर व आयुक्तांसमोर पाण्याच्या समस्या मांडल्या. महापौरांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना या समस्येवर आतापर्यंत काय उपाय केले, याची माहिती घेतली. परिसरात पाण्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा आणि तीन दिवसांत येथील पाणीपुरवठा सुरळीत करा, असे निर्देश महापौरांनी दिले.
यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी एनआयडी कॉम्प्लेक्स, आयुर्वेदिक कॉलनी, भांडे प्लॉट आदी परिसरातही पाणी समस्या असल्याची बाबत लक्षात आणून दिली. यावेळी एनआयटी कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी महापौर व आयुक्तांना निवेदनही सादर केले.
यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.