मुंबई : राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत अजित पवार यांनी ४० आमदारांसह सत्ताधारी भाजपा व शिंदे गटाशी हातमिळवणी केली. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांनी संताप व्यक्त केला. आता यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र आता आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहोत. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला युतीमध्ये घेण्याचा निर्णय योग्य होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी आपले मत मांडले.
शिंदे गट व अजित पवार गटाशी युती करूनही भाजपाला लोकसभेत कमी मत मिळाली का?यावर फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली. त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली.
पण हे दोन्ही पक्ष एक प्रकारे फुटून निघालेले नवीन पक्ष होते. त्यामुळे त्यांच्यासाठही ही निवडणूक आव्हानात्मक होती. मात्र आमची मतं आम्ही त्यांच्याकडे वळवू शकलो. विधानसभेत मात्र हे होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.