नागपूर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाची अंतिम सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले असून, सातही आरोपींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान आज आरोपींना फाशी होणार की जन्मठेपे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
26 फेब्रुवारी 2014 च्या मध्यरात्री भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा द्रुमिल या तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या घरातून 8.3 किलो सोने, 345 ग्रॅम चांदी आणि 39 लाख रुपये रोख असा साडेतीन कोटींचा ऐवज लंपास करण्यात आला होता. त्यानंतर या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात खळबळ माजली होती. पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत घटनेचा छडा लावला.यातील चार आरोपींना तुमसर येथून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एका आरोपीला मुंबईतून बेड्या ठोकल्या होत्या.