नागपूर : रेल्वे चोरीच्या वादातून झालेल्या मारहाणीमुळे रेल्वे प्रवाशाच्या मृत्यूचे प्रकरण आता नागपूर रेल्वे स्थानकाच्या शासकीय रेल्वे पोलिसांनी वर्धाच्या शासकीय रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे. हिंगणघाट ते वर्धा दरम्यान रेल्वे प्रवासी शशांक राज यांचा मृत्यू झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जीआरपी ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांनी दिली.
दरम्यान, रेल्वे प्रवासी शशांक राज यांचा मृतदेह नागपूरच्या शासकीय रेल्वे पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवला. त्याचा अहवाल आज आला नसला तरी अंतर्गत रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला असल्याची तोंडी माहिती गावंडे यांनी दिली. तसेच मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सांगितले.
2 जानेवारी रोजी दक्षिण एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण बोगीत चार आरोपींनी शशांक राज आणि कपिल कुमार या रेल्वे प्रवाशांचे मोबाईल फोन आणि रोकड चोरली होती. हा प्रकार समजल्यानंतर दोन्ही प्रवाशांची आरोपींसोबत जोरदार वादावादी झाली.
यावेळी आरोपींनी शशांक राज यांना लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली.काही वेळाने शशांक राज यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि तो बेशुद्ध पडला. नागपूर रेल्वे स्थानकांवर त्याला बोगुतून बाहेर काढण्यात आले तसेच शहरातील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.