नागपूर : टेकडी गणेश नागपूरचं आराध्य दैवत असून पौष महिन्यातली संकष्टी चतुर्थी तीळ चतुर्थी म्हणून मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यानिमित्ताने मंदीरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. हे पाहता मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात टेकडी गणेश मंदिर प्रशासनाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
यंदा 17 जानेवारीला शुक्रवारी तीळ चतुर्थी आहे.यानिमित्ताने संस्थेतर्फे टेकडी मंदिरात विशेष आकर्षक रोषनाई करण्यात येत असून “श्री” ना आकर्षक फुलांची सजावट पंकज अग्रवाल वर्धमान नगर नागपूर, यांच्यातर्फे करण्यात येत आहे. तसेच भक्तांकरीता 900 किलो रेवडीचा प्रसाद वितरीत करण्यात येणार आहे. अशावेळी कोणतीही दुर्घटना होवू नये व भाविकांना श्री चे दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून देवस्थान तर्फे विविध सेवा व व्यवस्था निःशुल्क पुरविण्याचा प्रयत्न असतो.
याप्रसंगी वाहतूक पोलीस विभाग, सिताबर्डी पोलीस स्टेशन,विशेष शाखा पोलीस यांचा पुरेसा बंदोबस्त व सहकार्य असते. याच बरोबर नागपूर महानगर पालिका, विद्युत विभाग, वैद्यकीय पथक, अग्निशामक दल. रक्षा विभाग, मॉडेल हायस्कूल शाळा, याचेही भरपूर सहकार्य लाभणार आहे.
तसेच भक्तांना सुरळीत दर्शन व्हावे याकरीता 500 स्वयंसेवकांची मदत घेण्यात येत आहे. तसेच संस्थेतर्फे सर्व महिला भक्तांना मौल्यवान वस्तू सोबत बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच या सर्व परिसरावर 50 सीसीटीव्ही कॅमेरांचीही नजर राहणार आहे.
दरम्यान या पत्रकार परिषदेला मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुळकर्णी, उपाध्यक्ष अरुण व्यास, सचिव दिलीप शहाकार यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.