नागपूर : शहरात मॉडीफाईड सायलेन्सर लावून दुचाकी वाहन चालविण्याने त्याच्या होणाऱ्या कर्नकर्कश आवाजामुळे जेष्ठ नागरिक तसेच इतर नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे नागपुर शहर वाहतूक विभागात या संदर्भात वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. याची गंभीरता लक्षात घेता वाहतूक विभागाकडून 5 ते 9 जानेवारी 2025 दरम्यान दुचाकी वाहनांवरील मॉडीफाईड सायलेन्सर विरूद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त अर्चित चांडक यांनी दिली.
मॉडिफाईड सायलेन्सर असलेले एकूण 440 दुचाकी वाहन जप्त करून चालकाविरोधात मोटार वाहन कायद्याचे कलम 190 (2) 198 अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच मॉडीफाईड सायलेन्सर काढून त्याजागी ओरीजनल सायलेन्सर लावून जप्त करण्यात आलेले मॉडीफाईड सायलेन्सर निकामी करण्यात आले.
तसेच यानंतरही मॉडीफाईड सायलेन्सर असलेले दुचाकी वाहन व वाहन चालकांविरुद्ध अशीच कठोर कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त अर्चित चांडक म्हणाले.नागपूर शहर वाहतुक विभागातर्फे अशा प्रकारची झालेली ही आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचेही त्यांनी नमूद केले.