Advertisement
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत अनेकांना या अपघातात जीव गमवावा लागला. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी शासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, या मागणीने जोर धरला होता.
यासंदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत महत्त्वाची माहिती दिली. महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे व अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाची ८ पथके आणि महामार्ग पोलीस विभागाची १४ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. समृद्धी महामार्गावर वाहन चालक व प्रवाशांच्या प्रबोधनासाठी टोल नाक्यांवर समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहेत. यामधून रस्ता सुरक्षा जनजागृती केली जाईल,असे देसाई म्हणाले.