नागपूर : नागपंचमी हा श्रावणातील महत्त्वाचा सण असून या दिवशी श्री शंकर आणि नागाचे पूजन करण्यात येते. श्रावण सोमवार व नागपंचमी असल्यामुळे शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. शहरातील विविध शिवमंदिरात व नाग मंदिरात भाविकांनी पूजा व अभिषेक केला.
महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. जागृतेश्वर मंदिरात कावडधारकांनी आणलेल्या पाण्यानी भगवान शिवाचा अभिषेक करण्यात आला. तेलंगखेडीच्या कल्याणेश्वर मंदिर व महालातील पाताळेश्वर मंदिरासोबतच दहन घाटावरील शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केल्याची माहिती आहे. महालातील चिटणीसपार्क येथील नागोबा मंदिरात सकाळपासूनच भाविक नागोबाच्या दर्शनाला जात आहेत.
दरम्यान काही वर्षापूर्वीपर्यंत नागपंचमीच्या दिवशी गारूडी सकाळी नागाला पेटाऱ्यात घेऊन गल्लोगल्ली फिरायचे.नागरिक याच नागाला दुधाचा नैवेद्य दाखवायचे. मात्र, वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार नाग बाळगण्यास तसेच जिवंत नाग पूजनावर बंदी आली आहे.